NAS | शिक्षणाच्या खालावलेल्या स्तराचा परिणाम संपादणूक सर्वेक्षणावर होणार | Online


 NAS नॅस झाल्यास गुणवत्ता पातळी खालावण्याची भीती.


परीक्षा पुढे ढकलण्याची शिक्षक व पालकांची मागणी 



नागपूर - राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्य़ातील निवडक शाळांमधील तिसरी, पाचवी, आठवी व दहावीमधील १०० टक्के विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी २०२१ (नॅस) आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र गेल्या दिड वर्षाहून अधिक काळ विद्यार्थी आॅनलाईन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मुळ संकल्पना आणि अभ्यास अभावी चाचण्या घेतल्याने शैक्षणिक गुणवत्तेची पातळी निश्चितच खालावणार असुन हे अव्यवहार्य असल्याचे मत विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) तर्फे मांडले आहे.

शिक्षण विभागाने राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणीसाठी दिवाळीची सुट्टी कमी केली. त्यामुळे ११ नोव्हेंबरला पुन्हा शाळा उघडणार आहेत. शाळांत सद्यस्थितीत ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. अन्य विद्यार्थी आॅनलाईन उपस्थित राहत आहेत. ग्रामीण भागात १ ली ते चौथीचे वर्ग आणि शहरी भागात पहिली ते आठवीचे वर्ग अजुनही सुरू झालेले नाहीत. मग तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना केवळ चाचणीसाठी शाळेत बोलावणे कितपत योग्य ठरेल? असा प्रश्न विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी केला आहे. या शिवाय १० नोव्हेंबर पर्यंत सुट्टी असताना शाळा व्यवस्थापनानी एका दिवसात चाचणीची तयारी व नियोजन कसे करावे? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शाळा व्यवस्थापन व शिक्षकांच्या अडचणी शिक्षण विभागाने समजून घ्याव्यात, अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने केली आहे.


तारीख पुढे ढकला

दिवाळीत अनेक विद्यार्थी पालकांसोबत गावी जातात. अनेक शिक्षक अजुनही वर्क फॉर्म होम आहेत. अशा परिस्थितीत विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांना पत्र लिहून नॅस सर्वेक्षणाची तारीखच पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे, अशी माहिती विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी दिली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनला पुरेशा वेळही मिळेल आणि शिक्षकांनाही विद्यार्थ्यांची चाचणीसाठी तयारी करुन घेता येईल असे मत त्यांनी मांडले आहे.



काय आहे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी

विद्यार्थ्यांचे वय इयत्ता यानुसार क्षमता विकसित झाल्या आहेत का हे पडताळण्यासाठी अध्ययन निष्पतीचे निकष केंद्रीय शिक्षण विभागाने निश्चित केले आहेत. या निकषानुसार विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येतो. या पार्श्‍वभूमीवर देशातील विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसाची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येते. या नुसार प्रत्येक जिल्ह्यातील १७३ शाळांमध्ये सर्वेक्षण होणार असून यात इयत्ता तिसरीचे ६१ वर्ग (शाळा), इयत्ता पाचवीचे ६१ वर्ग (शाळा) व इयत्ता आठवीचे ५१ वर्ग (शाळा) यांची निवड करण्यात आली आहे.

1 टिप्पणी: